Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) शिवसेनेच्या नेत्यांविरोधात अजून आक्रमक असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर (Dapoli Resort) हातोडा पडणार असल्याचे सूचक ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे. रिसॉर्टच्या बांधकामाप्रकरणी पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरवठा सुरू असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तत्कालीन मंत्री आणि महत्त्वांच्या नेत्यांविरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल परब यांचाही समावेश होता. दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ट्वीट करून अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरवठा सुरू असल्याचे सांगितले. येत्या दोन ते चार दिवसात रिसॉर्ट पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित असल्याचे सोमय्यांनी सांगितले.

दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची ईडीने चौकशीदेखील केली होती. ईडीने परब यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानीदेखील छापा मारला होता. त्यावेळी शिवसेनेने ही राजकीय सूडाने केलेली कारवाई असल्याचे म्हटले होते.

साई रिसॉर्ट प्रकरणी आधी कोणते आदेश होते?

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *