Janmashtami 2022 : ‘कृष्ण जन्माष्टमी’च्या पूजेत या कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ; पहा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । हिंदू पंचागानुसार, दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी (Janmashtami) साजरी केली जाते. या दरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. कृष्ण जन्माष्टमी व्रताला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रात अष्टमी तिथीला झाला होता. या दिवशी भक्त कृष्णाची जयंती साजरी करतात आणि उपवास ठेवत भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात.

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रात अष्टमी तिथीला मथुरेच्या तुरुंगात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. भगवान श्रीकृष्णाची जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी करतात. धार्मिक ग्रंथांनुसार, जो भक्त कृष्ण जन्माष्टमीचे व्रत करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो आणि आपल्या आवडत्या वस्तू आपल्या घरात ठेवतो, अशा भक्तांच्या जीवनात कधीच अडचणी येत नाहीत. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते. चला तर, जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करून घेण्यासाठी या पूजेत कोणत्या गोष्टींचा समावेश करावा…

मोरपीस
भगवान श्रीकृष्ण आपल्या मुकुटात मोराचे पीस धारण करतात. त्यामुळे जन्माष्टमीच्या पूजेमध्ये मोराच्या पिसांचा समावेश आवर्जून करावा. या पूजेच्या वेळी बालकृष्णाला फक्त मोराच्या पिसांचा मुकुट घाला. शास्त्रानुसार मोराची पिसे घरात ठेवणे शुभ मानले जाते.

बासरी
बासरी हे श्रीकृष्णाचं आवडतं वाद्य आहे. भगवान श्रीकृष्ण नेहमी बासरी वाजवत. म्हणूनच जन्माष्टमीच्या पूजेत बासरीचा समावेश जरूर करावा. श्रीकृष्णाला बासरी खूप प्रिय आहे.

तुळस
भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये तुळशीचा समावेश करणे शुभ मानले जाते. भगवान श्रीकृष्णाला तुळशी अत्यंत प्रिय आहे. भगवान श्रीकृष्णाला तुळस अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात असे मानले जाते.

लोणी
लोणी भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी पूजा केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला लोणी अर्पण करावे. यानंतर हे लोणी प्रसाद म्हणून लहान मुलांमध्ये वाटावे. श्रीकृष्णाला प्रेमाने ‘माखन चोर’ देखील म्हटले जाते. बालपणी कृष्ण मटकी फोडून त्यातील लोणी खायचे.

भारतात कृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या थाटामाटात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. हिंदू धर्मात असे मानले जाते की, भाऊ कंसाच्या अत्याचारानंतर तुरुंगात असलेल्या बहीण देवकीने भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाला आपल्या आठव्या अपत्याच्या रूपात जन्म दिला. कंसाच्या अत्याचारापासून आणि दहशतीपासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनीच हा अवतार घेतला होता. या पौराणिक कथेनुसार दरवर्षी भाद्रपदाच्या अष्टमीला कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *