उस्मानाबाद:-जिल्ह्यात सुमारे ५५% पंचनामे, उरलेले येत्या ४ दिवसांत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । सलमान मुल्ला । उस्मानाबाद । जिल्ह्यात अतिवृष्टी व विशेषतः सतत पडणाऱ्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना दि.०१.०८.२०२२ रोजी सूचना दिल्या होत्या. तरी देखील तालुकास्तरीय यंत्रणेकडून आजपर्यंत केवळ ५४.८४% पंचनामे झाले आहेत. मात्र उर्वरित प्रक्रिया ४ दिवसांत पूर्ण करून जिल्ह्याचा अहवाल देण्याचा शब्द श्री.महेश तीर्थकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिला आहे.

या अहवालावर राज्य सरकारला खास बाब म्हणून नैसर्गिक आपत्ती जाहीर करत अतिवृष्टीच्या नविन निकषांप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देता येणार आहे.

जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे बाधित क्षेत्र अंदाजे १५६००० हेक्टर असल्याची प्राथमिक माहिती कृषी व महसूल यंत्रणेने दिली आहे. यापैकी अंदाजे ८५००० हेक्टरचे पंचनामे करण्यात आले आहेत. वास्तविक पाहता जुलै-२०२२ मध्ये अनपेक्षित असा सततचा पाऊस अनेक दिवस होता.

यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या.

स्थायी आदेशातील निकषांच्या पलीकडे जाऊन नुकसानीचा वास्तववादी अहवाल राज्य सरकारकडे पाठविणे गरजेचे होते.

बाधित झालेल्या क्षेत्राचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून घेण्याची जबाबदारी संबंधित शेतकरी भगिनी व बांधवांवरती देखील आहे. शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या प्रक्रीयेतील कामाबाबत तक्रार असल्यास संबंधित तहसिलदारांकडे लेखी स्वरुपात देऊन, पोहोच घ्यावी.

तसेच हंगामातील या प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने पिक विम्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरु करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *