महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे बांगरांचे प्रकरण भलतेच अंगलट येणार हे लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी हिंगोलीचे फुटीर आमदार संतोष बांगर यांना धीराने घेण्याचा सल्ला दिला आहे. तुमचा प्रश्न जरी बरोबर असला तरी तुमची रिअॅक्ट करण्याची पद्धत बरोबर नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांना समजावले आहे. यापुढे असे प्रकार टाळता आले तर पाहा, अशी सूचनाही दिली आहे.
कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे सांगत हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एका उपाहारगृहाच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. संतोष बांगर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या व्हिडीओवर विरोधकांनी आक्षेप नोंदवला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट त्यांच्या स्टाइलने खडसावत ‘सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?’ असे म्हणत आमदार बांगर यांच्यावर तोंडसुख घेतले. विरोधकांच्या आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संतोष बांगर यांना समज दिली. ‘विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तरे द्या, अजिबात शांत बसू नका. पण आपण लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे आपलं वर्तन व्यवस्थित असले पाहिजे. एखादी गोष्ट समाजावून सांगताना ती लोकशाही मूल्ये आणि संविधानिक भाषेत समजावून सांगावी. आपल्याकडून कोणतेही चुकीचे वर्तन होणार नाही याची काळजी घ्या,’ असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना दिला.