आरटीई प्रवेशाच्या 23 हजार जागा रिक्तच; राज्यभरात 78 हजारांवर आरटीईचे प्रवेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यात यंदा 78 हजारांवर प्रवेश झाले असून, 23 हजार जागा रिक्तच आहेत; परंतु शिक्षण विभागाकडून 3 ऑगस्टनंतर कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया संपली की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा राज्यातील 9 हजार 86 शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या 1 लाख 1 हजार 906 जागांसाठी 2 लाख 82 हजार 783 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले.

त्यातील नियमित आणि प्रतीक्षा यादी मिळून 1 लाख 23 हजार 952 विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झाला. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी चौथ्या फेरीत 30 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. संबंधित प्रवेश 3 ऑगस्टपर्यंत चालले, परंतु त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रिया संपली किंवा सुरू आहे. याबाबत कोणत्याही सूचनाच देण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात आरटीई प्रवेशाच्या नियमित फेरीमध्ये 62 हजार 752 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले, तर प्रतीक्षा यादीतील 16 हजार 137 अशा 78 हजार 889 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. प्रवेश प्रक्रिया राबविणार्‍या पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना प्रवेश प्रक्रियेविषयी विचारले असता प्रवेश प्रक्रिया राबवायची की बंद करायची, याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सूचना देणे अपेक्षित होते, पंरतु 3 ऑगस्टनंतर कोणत्याही सूचना प्रवेशासंदर्भात देण्यात आलेल्या नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *