ENG vs SA: दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडची मस्ती उतरवली ; लॉर्ड्सवर लाजिरवाणा पराभव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । लॉर्ड्स कसोटीआधी (Lords Test) दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गरने (Dean Elgar) इंग्लंड विरुद्ध जे म्हटलं होतं, त्यांच्या टीमने मैदानावर बिलकुल तशीच कामगिरी करुन दाखवली. बेन स्टोक्स आणि ब्रँडन मॅक्कलम जोडीची विश्व क्रिकेटमधील ‘बेजबॉल‘ची पहिल्यांदा हवा काढली. न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध आक्रमक क्रिकेट खेळून इंग्लंडने सलग चार कसोटी सामने जिंकले होते. त्यांचा आत्मविश्वास कमलीचा उंचावला होता. या इंग्लिश संघाला आता दक्षिण आफ्रिकेने (ENG vs SA) पराभवाचं पाणी पाजलं आहे. लॉर्ड्स मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला फक्त अडीच दिवसात एक डाव आणि 12 धावांनी हरवलं.

इंग्लंडच्या सलग चार विजयानंतर ब्रँडन मॅक्क्लमच्या आक्रमक क्रिकेट ब्रँडला ‘बेजबॉल’च नाव देण्यात आलं होतं. अशा प्रकारच्या क्रिकेट बद्दल इंग्लंड आणि जागतिक क्रिकेट मध्ये उत्साह दिसत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेवर सगळ्यांच्या नजरा होत्या. कारण या संघाकडे घातक गोलंदाजी आक्रमण आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गरने सीरीज सुरु होण्याआधी बेजबॉल चर्चेकडे दुर्लक्ष केलं होतं. “मला यात रस नाही, फक्त इंग्लंडचा हा अप्रोच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांविरोधात यशस्वी होतो की, नाही, ते पहायचं आहे” असं त्याने म्हटलं होतं.

लॉर्ड्स कसोटी फक्त अडीच दिवसात संपली. एल्गरने आपल्या गोलंदाजांवर दाखवलेला विश्वास एकदम योग्य होता. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करुन सीरीज जिंकली होती. त्यावेळी भारताला विजयासाठी फेव्हरेट मानलं जात होतं. आता दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडच्या संघाला मोसमातील पहिला पराभवाचा धक्का दिला आहे. सामन्याच्या तिसऱ्यादिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 326 धावात आटोपला. त्यांच्याकडे 161 धावांची आघाडी होती.

पहिल्या डावात कगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्खियाच्या वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव 165 धावात आटोपला होता. इंग्लिश फलंदाजांकडून दुसऱ्याडावात दमदार फलंदाजीची अपेक्षा होती. पण यावेळी स्थिती आणखी खराब झाली. दक्षिण आफ्रिकेच्या आग ओकणाऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव 149 धावात आटोपला. अशा प्रकारे एक डाव आणि 12 धावांनी आफ्रिकेने सामना जिंकला. तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 आघाडी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *