पुणे : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी झाल्याने मध्यभागात वाहतूक कोंडी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून खरेदीसाठी मंडई, तुळशीबाग परिसरात शनिवारी गर्दी झाली. शहर तसेच उपनगरातून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी आल्याने मध्यभागात वाहतूक कोंडी झाली. कोंडीतून वाट काढत नागरिकांनी खरेदी केली.

गणेशोत्सवाचा प्रारंभ ३१ ऑगस्ट रोजी होणार असून खरेदीसाठी आठवडा राहिला आहे. गणेशोत्सवातील सजावट तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी शनिवारी (२० ऑगस्ट) मंडई, तुळशीबाग परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता तसेच मध्यभागातील गल्ली बोळातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्यभागात खरेदीसाठी अनेकजण मोटारीतून आले होते. मोटारींमुळे वाहतूक कोंडीत भर पडली. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मंडई परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याच्या पाहायला मिळाले.

रविवार पेठेतील कापडगंज, बोहरी आळी परिसरात सजावट साहित्याच्या खरेदीसाठी झाली होती. मंडई परिसरातील वाहनतळावर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने अनेकांनी नदीपात्रातील रस्त्यावर वाहने लावली होती. सदाशिव पेठ, नारायण पेठेतील गल्ली बोळात बेशिस्तपणे दुचाकी लावण्यात आल्याने गल्ली बोळातील वाहतूक विस्कळीत झाली. कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *