राज्यात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी येणाऱ्या 3-4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र विदर्भातील पावसामुळे काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतुकीवरही याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. तसेच कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांचा अंदाज आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. आगामी आठवडाभर 25 ते 26 ऑगस्टपर्यंत मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यात पावसाची स्थिती अशीच असेल. त्यापुढेही लवकर उघडीपीसाठी वाट बघावी लागेल, असा अंदाज आहे. विदर्भातही 10 जिल्ह्यात दोन दिवसाच्या उघडीपीनंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे.


मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात आठवडाभर राहणार

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या 4 जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीतील घाटमाथ्यावरील घोटी, इगतपुरी, लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी व परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात व विदर्भात मंगळवारपासून काहीशी उघडीप जाणवत असली तरी दरम्यानच्या काळात त्यानंतर तेथे तुरळक ठिकाणी किरकोळ व हलक्या पावसाची शक्यता पुढील आठवडाभर कायम राहणार आहे.

कुठे पूर तर कुठे रिमझिम

राज्यातील काही भागात पूरस्थिती तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या मध्यम सरी कोसळत आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांना देखील खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह परिसरात देखील रिमझीम पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *