आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली मनातील खदखद : सीनियारिटीचे आता काही राहिले नाही

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । एकनाथ शिंदेंच्या बंडात सुरुवातीपासून बिनीचे शिलेदार असलेले औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील आमदार संजय शिरसाट मंत्रिपद नाकारल्यापासून नाराज आहेत. रविवारी एका कार्यक्रमात त्यांनी ‘अतुल सावे मागून येऊन कॅबिनेट मंत्री झाले. आमच्याकडेही काही बघा,’ अशा शब्दांत भाजप नेत्यांसमोर मन मोकळे केले. तसेच राजकारणात आता सीनियारिटीचे काही राहिले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

शिंदे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आपण मंत्री होणार असा दावा शिरसाट करत होते. केवळ मंत्रिपदच नव्हे, तर कोणते खाते मिळणार, औरंगाबादचे पालकमंत्रिपद मिळणार असे दावेही त्यांच्या गोटातून केले जात होते. मात्र अतुल सावे, अब्दुल सत्तार व संदिपान भुमरे अशा औरंगाबादच्या तीन-तीन नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदे दिल्याने शिरसाट यांचा पत्ता एेनवेळी कट झाला. त्यामुळे ते नाराज झालेत. यापूर्वीही त्यांनी ‘उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुख’ असे एक रात्रीतून टि‌्वट करुन नंतर डिलिट करत आपली नाराजी दर्शवण्याचा प्रयत्न केला होता.

रविवारी औरंगाबादेत त्यांच्या मतदारसंघात चार रस्त्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर भाजपचे सहकार मंत्री अतुल सावे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे उपस्थित हाेते. त्यावेळी भाषणात गमतीने शिरसाट म्हणाले, ‘खरे तर सावे यांचे वडिल मोरेश्वरजी यांच्यासोबत मी काम केले आहे. त्यावेळी अतुल हे राजकारणात येतील असेही वाटले नव्हते. मात्र ते राजकारणात आले. आधी राज्यमंत्री व आता कॅबिनेट मंत्रीही झाले. याचा आनंदच आहे. पण आमच्याकडेही काही बघा’ असे शिरसाट म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *