ऐन सणासुदीला महाराष्ट्रात लोडशेडिंगचे संकट? कोळशाचे व्यवस्थापन करीत वीजनिर्मिती करताना आता तारेवरची कसरत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । पावसाचा जोर कमी होऊ लागताच उष्णता वाढू लागली आहे. विजेची मागणी वाढण्याची शक्यता असताना महानिर्मितीच्या सात वीज केंद्रात केवळ पाच दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी महानिर्मितीला कोळशाचे व्यवस्थापन करीत वीजनिर्मिती करताना आता तारेवरची कसरत करावी लागत आहे.

राज्यात महानिर्मितीचे चंद्रपूरसह कोरडी, खापरखेडा, पारस, भुसावळ, परळी व नाशिक असे सात केंद्र आहेत. मान्सूनपूर्व काळात कोळसा संकट आल्याने महानिर्मितीच्या वीज केंद्रात अतिरिक्त साठा होऊ शकला नाही. त्यातच कोळसा खाणी क्षेत्रात अलीकडे झालेला मुबलक पावसामुळे ओल्या कोळशाचे संकट उभे ठाकले आहे. पावसामुळे कोळशाचा पुरवठा प्रभावित झाला आहे. अशीच स्थिती राहिल्यास मान्सूननंतर वाढलेली कोळशाची मागणी पूर्ण करणे कठीण होणार, असे मानले जात आहे. सध्या महानिर्मितीच्या केंद्रात ६ लाख १० हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. या सर्व केंद्रातून वीजनिर्मिती करताना सुमारे १ लाख ४० हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. यात येणाऱ्या कोळशाची आवक ९० हजार मेट्रिक टन आहे. त्यात खंड पडलेला नाही. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता वीज सूत्रांनी फेटाळून लावली आहे. पण, महानिर्मितीला कोळशाचे व्यवस्थापन करीत वीजनिर्मिती करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *