महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आमच्यासोबत आले कारण ते जाणतात की बाळासाहेबांचं खरं स्वप्न काय आहे हे ते. बाळासाहेबांनी कायम हिंदुत्वाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्याचं तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिंदेगट आमच्यासोबत आला, असं भाजपचे नेते एव्हाना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वारंवार सांगताना दिसतात. त्याला आजच्या सामनाच्या अग्रलेखात परखड शब्दात उत्तर देण्यात आलं आहे. बाळासाहेबांचं (Balasaheb Thackeray) खरं स्वप्न सांगताना भाजपला वाजपेयी आणि अडवाणी यांची आठवण करून देण्यात आली आहे. “बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान आहे. हे लोक अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या मायबापांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार? शिवसेना म्हणजे जनतेची शक्ती आहे. ही शक्ती दुर्बल होऊ नये म्हणून आम्ही तळमळतो. हेच बाळासाहेबांचे स्वप्न आहे. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असे तोंडाने बोलायचे व कृती औरंगजेबाची करायची. हे धंदे चालणार नाहीत. मुंबई गिळायची हे तुमचे स्वप्न शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. हेच बाळासाहेबांचे स्वप्न ! घोडा मैदान लांब नाही. तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.