एकनाथ शिंदें यांच्या विधानानंतर काही तासांतच करुणा शर्मा भेटीला, बाहेर येताच धनंजय मुंडेंना थेट आव्हान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ऑगस्ट । तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी विधानसभेत निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर तेव्हा ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली. पण, परत परत ती दाखविता येणार नाही, असे सूचक उद्गार शिंदे यांनी मुंडेंबाबत काढले. या विधानानंतर काही तासांतच करुणा शर्मा यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

करुणा शर्माने एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. मात्र ही भेट सदिच्छा भेट असल्याचं करुणा शर्मा यांनी स्पष्ट केलं. हे सरकार बदलल्यामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं. सरकार बदलल्यामुळे खूश आहे, मला एकनाथ शिंदेंकडून न्यायाची अपेक्षा आहे. मला १६ दिवस जेलमध्ये टाकल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

माझ्यावर जश्या खोट्या केस केल्या तशाच केस मी त्यांच्यावरही केल्या असत्या. पण मी तसं नाही केलं. कारण लोकांनी मी देवाला मानते.ज्यांना सत्तेची मस्ती होती त्यांची मस्ती आता उतरली. ज्यांनी खोटी केस केली त्यांना शिक्षा मिळाली. निर्लज्ज लोकांना त्यांच्या पापांची फळं मिळतातच, अशी टीका करुणा शर्मा यांनी केली आहे.

तसेच मला ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावाही करुणा शर्मा यांनी केला आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये मी सगळे उमेदवार उभे करणार आहे. धनंजय मुंडेंनी मला हरवून दाखवावं, असं आव्हानही करुणा शर्मा यांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर केलं आहे.

धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा वाद काय आहे?
करुणा शर्मांची बहीण रेणू शर्मा यांनी गेल्या वर्षी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी केला.
करुणा शर्माच्या दाव्याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली, तसेच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन अपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *