सत्ता हातात द्या, सर्व टोलनाके बंद करून दाखवतो : राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो असा आरोप विरोधकांकडून केला जातो. परंतु मनसेनं टोल, भोंग्याचं आंदोलन यशस्वी करून दाखवलं. तुमच्या पक्षाने काय केलं, टोलच्या माध्यमातून जमा झालेला पैसा कुठे जातो?. टोलवसुलीबाबत कोणतंच सरकार काहीही उत्तर देत नाही. टोलचा पैसा राजकारण्यांच्या खिशात जातो, असा आरोप करून सत्ता हातात द्या, सर्व टोलनाके बंद करून दाखवतो, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.२३) येथे केले. मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात आयोजित मनसे पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

टोलमुक्त आंदोलनाबाबत मनसेबद्दल होणाऱ्या अपप्रचाराला उत्तर द्या. अशा सुचना त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या. त्याचबरोबर एकमेकांबद्दल सोशल मीडियावर टीकाटिप्पणी केल्यास, उणीदुणी काढल्यास पक्षात ठेवणार नाही, असा सज्जड इशारा राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना यावेळी दिला. भाजप शिवसेना युतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत सूत्र ठरलेलं असताना शिवसेनेनं आमदार कमी असताना मुख्यमंत्री पद कसे काय मागितलं,असा सवाल करून त्यावेळीच तुम्ही पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना का सांगितलं नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील राजकारणात खेळखंडोबा सुरू आहे. आता कोण कुणामध्ये मिसळलं तेच काही समजत नाही, असे म्हणत त्यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर टीका केली. छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे हे सर्वजण एका पक्षात आणि सत्तेत गेले. परंतु मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. माझे बंड नव्हते. त्यामुळे शिंदे, राणे यांच्या बंडाशी माझी तुलना करू नका. मी गद्दारी केली नाही. मी तुमच्या विश्वासावर नवीन पक्ष काढला, असे भाष्य राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडाळीवर केले.

दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका तडजोड, लाचार होऊन लढवू नका. तुमची किंमत शून्य करून घेऊ नका. मत मागायला येतात, तेव्हा त्यांना जाब विचारा, असे आवाहन करत निवडणुकांना ताकदीनं सामोरे जा, असे राज ठाकरे म्हणाले. गणपतीनंतर राज्यात दौरे करणार असल्याचे सांगून माझ्याकडे बाळासाहेबांचे नाव नाही. परंतु विचार आहेत. त्यांचा वारसा पुढे न्यायचा आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *