राजू श्रीवास्तव यांना ऐकवला जातोय बिग बी यांचा आवाज; ‘हे’ आहे खास कारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांच्या उपचारासाठी न्यूरोफिजियोथेरेपीचा वापर करणं आता सुरू केलं आहे. न्यूरोफिजियोथेरेपी या उपचार पद्धतीत रुग्णांना त्यांच्या आवडत्या लोकांचा आवाज ऐकवला जातो जे त्यांच्या फार जवळ असतात. त्या आवाजामुळे रुग्णाची हरपलेली शुद्ध परत येते असं म्हटलं जाते. राजू श्रीवास्तव यांना या उपचारपद्धतीत कोणत्याही कुटुंबियांचा किंवा नातेवाईकांचा नाही तर बॉलिवूडचे शेहनशहा अर्थात अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकवला जात आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी एक व्हॉईस नोट पाठवली होती. या व्हॉईस नोटमध्ये “उठ राजू आणि लोकांना पुन्हा हसायला शिकव…” असं अमिताभ बच्चन राजू यांना सांगत आहे. न्यूरोफिजियोथेरेपी दरम्यान अमिताभ बच्चन यांचा आवाज राजू श्रीवास्तव यांच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. त्यांच्या आवाजाला राजू श्रीवास्तव प्रतिसाद देतात की नाही याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र ते लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना केली जात आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवाही उठवल्या जात आहेत. यापूर्वी राजू यांचा भाऊ दीपू यांनी कॉमेडियनच्या प्रकृतीबाबत खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना फटकारले होते. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना ते अजूनही आयसीयूमध्ये असल्याचे सांगितले. दीपू पुढे म्हणाले, राजू भाई एक फायटर आहे. ते लवकरच हे युद्ध जिंकतील आणि पुन्हा एकदा आपल्या कॉमेडीने तुम्हाला खळखळून हसवतील. खोट्या अफवांकडे लक्ष देऊ नका. मी इतकंच म्हणेन की, तुम्ही लोक प्रार्थना करत राहा. डॉक्टर त्यांचे काम करत आहेत. डॉक्टरांची संपूर्ण टीम अहोरात्र प्रयत्न करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *