भाज्यांचे दर कमी होण्याचे चिन्ह नाहीच ; आणखी दरवाढ होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । श्रावण महिना सुरू होण्याआधीपासूनच वाढलेले भाज्यांचे दर उतरण्याची चिन्हे दिसत नसून आगामी गणेशोत्सव काळात भाज्यांची मागणी वाढणार आहे, त्यामुळे भाज्यांचे दर आणखी चढे राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. घाऊक बाजारातच भाज्या महागल्याने किरकोळ बाजारात हेच दर ८० ते १०० रुपये किलोच्या घरात आहेत. त्यामुळे अर्धा किलोच्या जागी पाव किलो भाजी घेऊनच सर्वसामान्यांना समाधान मानावे लागत आहे.

यावर्षी उन्हाळ्यापासूनच भाज्यांचे दर चढे राहिले आहेत. त्यानंतर अति पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले. त्यामुळे मुंबईत पोहोचणारी भाजी खराब होत होती. तसेच, भाज्यांचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे बाजारात भाज्यांचे दर चढेच राहिले. दरवर्षी श्रावणात भाज्या स्वस्त होतात. यंदा मात्र ग्राहकांना चढ्या भावानेच भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत. गणेशोत्सव काळातही महागच भाज्या खरेदी कराव्या लागणार आहेत, अशी शक्यता बाजारातील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

भाज्यांचे घाऊक दर

भाजी प्रति किलो (रुपयांत)

भेंडी ३५ ते ५०

चवळी ४० ते ६०

फरसबी ५० ते ८०

फ्लॉवर १५ ते ३०

गवार ५५ ते ७५

घेवडा ४० ते ६०

ढोबळी मिरची ४० ते ४५

परवल ४५ ते ५५

शेवगा ४० ते ५०

शिराळी दोडकी ४० ते ६०

तोंडली ५० ते ७०

वाटाणा ७० ते १००

मिरची, कोथिंबीरही महागली

दररोज हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यानुसार बाजारात ज्वाला मिरची, लवंगी मिरचीला जास्त मागणी असते. मात्र घाऊक बाजारात सध्या मिरचीचे दर ४० ते ६० रुपये किलो आहेत, तर किरकोळ बाजारात ८० ते ९० रुपये किलो आहे. गेल्या आठवड्यापर्यंत कोथिंबिरीची एक जुडी घाऊक बाजारात ८ ते १० रुपये होती. किरकोळ बाजारात ही जुडी २० रुपयांपर्यंत मिळत होती. मात्र घाऊक बाजारातच कोथिंबीर जुडी २५ ते ३० रुपये झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी ४० ते ५० रुपये झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *