खराब रस्ते का बनवले जातात? इकोसिस्टिमवर गडकरी थेटच बोलले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. नव्याकोऱ्या रस्त्याला अवघ्या काही दिवसांत भेगा पडू लागतात. हळूहळू रस्त्यांवर खड्डे निर्माण होतात. यामुळे प्रवाशांचा प्रवास बिकट होतो. या सगळ्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी स्पष्टपणे भाष्य केलं आहे. रस्ते खराब झाल्यावर त्याची दुरुस्ती केली जाते. वारंवार होणाऱ्या दुरुस्तीमुळे अनेकजण समाधानी होतात. राजकारणी, अधिकारी, कंत्राटदार या सगळ्यांनाच दुरुस्तीच्या कामामुळे समाधान मिळतं आणि यामागचं कारण सगळ्यांनाच माहीत आहे, असं गडकरी उपरोधिकपणे म्हणाले. फिक्कीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दुरुस्तीच्या कामामुळे सगळ्यांनाच आनंद मिळतो. राजकारणी, अधिकारी आणि कंत्राटदार सारेच दुरुस्तीच्या कामांमुळे आनंदी होतात. सततच्या देखभाल दुरुस्तीमुळे खूपच समाधान मिळतं. यामध्ये केवळ लोकांचं नुकसान होतं. दीर्घकाळ टिकणाऱ्या रस्त्यांसाठी निर्णय घेतले जातात, तेव्हा कंत्राटदार नाराज होतात. आपल्या व्यवसायाला यामुळे धक्का बसेल, असं त्यांना वाटतं, असं गडकरी यांनी म्हटलं.

देशभरातील शहरांमध्ये वारंवार रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं होत असतात आणि ही बाब आता अतिशय सामान्य झाली आहे, असं गडकरी म्हणाले. नवं तंत्रज्ञान आणि सामग्रीच्या मदतीनं दीर्घकाळ टिकणारे रस्ते बांधणं ही आता परिस्थितीची गरज आहे. ८ इंची व्हाईट टॉपिंग आणि रबराचा वापर करून रस्ते तयार करण्यासंदर्भात योजना आखली जात आहे. असे रस्ते २५ वर्षे टिकतील आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च अत्यंत कमी असेल, अशा शब्दांत गडकरींनी भविष्यातील योजना सांगितल्या.

रस्ते प्रकल्पांच्या शेजारी अधिकाऱ्यांनी त्यांची नावं लिहावीत. त्यामुळे रस्त्यांच्या दर्जाला कोण जबाबदार आहे याची माहिती लोकांना मिळेल, असा सल्ला एकदा अधिकाऱ्यांना दिला होता, असा किस्सा गडकरींनी सांगितला. लोकांनी केवळ माझेच पुतळे का जाळावेत? खराब रस्त्यांना कोण जबाबदार आहे ते लोकांना कळायला हवं, असं मी अधिकाऱ्यांना हसत हसत सांगितलं होतं, अशी आठवण गडकरींनी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *