भाजपला ‘दहशत’ म्हणत शिवसेनेचा घणाघात ; ऑपरेशन लोटसची थेट अल-कायदासोबत तुलना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. आजच्या अग्रलेखात केंद्र सरकारला 2024 चे भय वाटते आहे. हे भय केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार व शरद पवारांचे आहे. इतके मोठे बहुमत असताना या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच, त्यांचे बहुमत निखळ नाही, ते चोरलेले आहे. असे म्हणताना ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द आहे, असे आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

सामनाचा अग्रलेख –

देशाची परिस्थिती संभ्रमित झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अशा अनेक संभ्रमित गोष्टींचे सध्या पेव फुटले आहे. सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे असे जे सुरू आहे त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला. ‘दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन कमळ ‘फेल’ गेले आहे. भाजप उघडा पडला आहे’, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

बिहारमध्येही ‘ऑपरेशन कमळ’ चालले नाही व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी अमित शहा यांना खुले आव्हान दिले की, ‘‘ईडी, सीबीआय वगैरे लावून माझे सरकार पाडून दाखवा.’’ महाराष्ट्रात ईडीच्या भयाने शिंदे गट गुडघ्यावर गेला तसे इतर राज्यांत कोणी वाकायला तयार नाहीत. सगळ्यांत महत्त्वाची घडामोड दिल्ली राज्यात घडली. ईडी, सीबीआयचा वापर करून केजरीवाल यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिल्ली सरकारचे मद्य धोरण, त्यांची अबकारी नीती, त्यांनी मद्यविव्रेत्यांना दिलेले ठेके हा भाजपच्या दृष्टीने टीकेचा विषय असेल, पण तो निर्णय व्यक्तिगत नव्हता, तर संपूर्ण सरकारचा होता व त्यात दिल्लीच्या नायब राज्यपालांचाही समावेश असतो. पण ‘कॅबिनेट’च्या निर्णयाचे खापर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांवर फोडून त्यांच्यावर सीबीआयने धाडी टाकल्या. त्यांना या प्रकरणात पहिल्या क्रमांकाचे आरोपी केले व हे प्रकरण आता ईडीकडे, म्हणजे भाजपच्या विशेष शाखेकडे सुपूर्द केले.

मनीष सिसोदियांवर अटकेची टांगती तलवार आहे. सिसोदिया हे काही पळून जाणारे गृहस्थ नाहीत, पण एखाद्या गुन्हेगारांप्रमाणे त्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी करून लोकनियुक्त सरकारची मानहानी केली गेली. म्हणूनच देशाची स्थिती संभ्रमित आहे, असे श्री. पवार म्हणतात ते खरे आहे. हे सर्व केजरीवाल यांचे सरकार पाडण्यासाठी सुरू आहे. आता श्री. मनीष सिसोदिया यांनी भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’वर बॉम्ब टाकला आहे. ‘‘भाजपमध्ये प्रवेश करा, आपचे आमदार फोडून आणा व मुख्यमंत्री व्हा. तसे केल्यास आपल्या विरोधातील ईडी, सीबीआयची सर्व प्रकरणे बंद करू,’’ अशी ऑफर भाजपने दिल्याचा दावा सिसोदिया यांनी केला.

‘आप’चे आमदार फोडण्यासाठी वीस-वीस कोटी रुपयांची ‘ऑफर’ दिल्याचा आरोप तर स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच केला आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ हे लोकशाही व स्वातंत्र्यासाठी किती घातक आहे हे किळसवाण्या पद्धतीने समोर आले. महाराष्ट्रात याच पद्धतीने ऑपरेशन केले गेले, पण मोठे राज्य असल्याने व शिवसेना पह्डणे हाच मुख्य अजेंडा असल्याने ईडीचा धाक अधिक पन्नास ‘खोके’ अशी बेगमी केली असे सर्रास बोलले जाते. महाराष्ट्रातील मेंढरे घाबरून पळाली तसे दिल्लीचे आमदार व त्यांचे नेते पळाले नाहीत. ते भाजप व ईडीविरोधात ठामपणे उभे राहिले. महाराष्ट्रात शिवसेना नेते संजय राऊत हे बेडरपणे ईडीला सामोरे गेले. ते मऱ्हाटी बाण्याने लढले, पण वाकले नाहीत व सच्च्या शिवसैनिकाप्रमाणे झुंजले. तसेच कडक धोरण मनीष सिसोदिया यांनी स्वीकारले. सिसोदिया हे छत्रपती शिवरायांच्या मावळय़ाप्रमाणे गरजले.

स्वाभिमानाची तलवार हातात घेऊन त्यांनी सांगितले, ‘‘कारस्थाने करणाऱ्या भ्रष्ट लोकांपुढे आपण अजिबात झुकणार नाही.’’ दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया पुढे म्हणतात ते महत्त्वाचे, ‘‘मी महाराणा प्रताप यांचा वंशज आणि राजपूत आहे. माझा शिरच्छेद केला गेला तरी चालेल, पण भ्रष्ट आणि षड्यंत्र रचणाऱ्या लोकांपुढे मी कधीच झुकणार नाही. हेच माझे भाजपला उत्तर आहे. माझ्या विरोधातील सर्व प्रकरणे खोटी आहेत. तुम्हाला जे करायचे ते करा!’’ श्री. सिसोदिया यांनी हे सर्व हिमतीने सांगितले. ‘‘मरण पत्करीन, पण शरण जाणार नाही. मला खोट्या प्रकरणात गुंतवले आहे,’’ असे संजय राऊत शेवटपर्यंत म्हणाले व तुरुंगात जाणे त्यांनी पसंत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *