महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । देशात 5G सेवा सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) गुरुवारी 6G संदर्भात मोठी घोषणा केलीय. पीएम मोदी म्हणाले, सरकार या दशकाच्या अखेरीस 6G लाँच करण्याची तयारी करत आहे. स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या (Smart India Hackathon 2022) ग्रँड फिनालेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली.
पीएम मोदी पुढं म्हणाले, ‘शेती आणि आरोग्य क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी तरुण नवीन उपायांवर काम करू शकतात. आम्ही या दशकाच्या अखेरीस 6G लाँच करण्याची तयारी करत आहोत. सरकार गेमिंग आणि मनोरंजनामध्ये भारतीय उपायांना प्रोत्साहन देत आहे. सरकार ज्या पद्धतीनं गुंतवणूक करत आहे, त्याचा सर्व तरुणांनी लाभ घ्यावा.’
रोज नवनवीन क्षेत्रं आणि आव्हानं नाविन्यपूर्ण उपायांद्वारे शोधली जात आहेत. मोदींनी नवसंशोधकांना शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यास सांगितलंय. तरुण नवोदितांना प्रत्येक गावात ऑप्टिकल फायबर आणि 5G लाँच, गेमिंग इकोसिस्टमला चालना देण्यासारख्या उपक्रमांचा पूर्ण लाभ घेण्यासही सांगितलंय. भारत या वर्षी ऑक्टोबरपर्यंत 5G तंत्रज्ञानाचा रोलआउट पाहण्यास तयार आहे, असंही मोदी म्हणाले.
याआधी एका पत्रकार परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) म्हणाले, या वर्षी ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे. उद्योगानं 5G पायाभूत सुविधांसाठी काम सुरू केलंय आणि 2-3 वर्षांत ते देशाच्या प्रत्येक भागात पोहोचेल. आम्ही उद्योगांना 5G शुल्क परवडणारे आणि प्रवेशयोग्य ठेवण्याची विनंती केलीय. आमचे मोबाईल सेवा शुल्क जगातील सर्वात कमी आहे. भारतीयांना जागतिक दर्जाची 5G सेवेची सुविधा मिळणार आहे. 5G जलद गतीने सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायऱ्या अतिशय चांगल्या आणि पद्धतशीरपणे सुरू आहेत, असं त्यांनी सांगितलं.