महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । रशिया युक्रेनमधलं युद्ध सुरू होऊन आता सहा महिने लोटले आहेत. तरी या दोन देशांमधला तणाव कमी होत नाहीय. हे युद्ध थांबवण्याचे प्रयत्न जगभरातून होत आहेत. मात्र हे युद्ध कधीच थांबणार नाही, असं सूचक विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निकटवर्तीयाने केलं आहे. (Russia Ukraine War Updates)
रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव आता रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष आहे. फ्रान्समधल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलं की, रशिया युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की (Volodimir Zelensky) यांच्यासोबत चर्चेसाठी तयार आहेत, मात्र त्यासाठी काही अटी असतील. फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या लष्करी कारवायांच्या आधीही रशियाने स्पष्ट सांगितलं होतं की युक्रेनने नाटोचा सदस्य होणं, आपल्याला पटलेलं नाही.
नाटोच्या सदस्यत्वाचा त्याग करणं आता अत्यावश्यक आहे. पण आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते अपुरं आहे, असं विधान मेदवेदेव यांनी केलं आहे. रशियाने सांगितलं की, जोवर आपला उद्देश सफल होत नाही, तोवर रशिया युक्रेनमधल्या लष्करी कारवाया थांबवणार नाही. पुतीन (Vladimir Putin) म्हणतायत की, त्यांना युक्रेनमधून नाझी पूर्णतः संपवायचे आहेत. पण क्यीव आणि पाश्चिमात्यांचं म्हणणं आहे की युद्धासाठी हे अत्यंत निराधार कारण आहे. युद्ध सुरू झाल्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण त्याने युद्धावर कोणताही फरक पडला नाही.