महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । येत्या 4-5 दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस राहिल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.1 सप्टेंबरपासून पावसात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे शेतीच्या कामाचे नियोजन करावे, असे आवाहन भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी केले आहे.
विदर्भात पावसाची शक्यता
राज्यभरात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. मुंबई परिसरात तसेच राज्यातील काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २७) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
धरणांत पुरेसा पाणीसाठा
राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जुलै आणि ऑगस्टच्या सुरुवातीला मध्ये पावसाने राज्यभरात दमदार हजेरी लावली. त्यामुळे नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला. शेतीचे मोठे नुकसान झाले. मात्र, गेल्या आठवडाभरात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्याने बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला. मात्र, पिकांसाठी पुन्हा पावसाची गरज असल्याने बळीराजाची नजर पावसाकडे लागली आहे.
यावर अजून किमान 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता नाही.1 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेती कामाचे नियोजन करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुरामुळे 138 जणांचा मृत्यू
दरम्यान, पावसामुळे राज्यात शेतीचे किती नुकसान झाले, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात माहिती दिली. फडणवीस यांनी सांगितले की, अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात आतापर्यंत 138 जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तातडीची मदत केली आहे. अतिवृष्टीने राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली होती.