महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत प्रथमच शिंदे गट व ठाकरे गटाचे नेते एकत्र व्यासपीठावर आले. काही वेळ हास्यविनोद झाले. पण सूत्रसंचालक पोलिस अधिकाऱ्याने सुरुवातीला येऊन बसलेले चंद्रकांत खैरे यांचा सत्कार सर्वात आधी केला. त्यामुळे चिडून आमदार शिरसाट ताडकन उभे राहिले.
‘प्रोटोकॉल आहे की नाही?’ असे म्हणत शिरसाट कार्यक्रमातून निघून जाऊ लागले. पण, खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांना शांत केले व खाली बसवले. पोलिस आयुक्तांनीही शिरसाटांना शांत राहण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्याने शिरसाट यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले खरे. मात्र, शिरसाट यांच्या चेहऱ्यावरील राग यावेळी स्पष्टपणे दिसत होता.
समन्वय समितीची बैठक
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी औरंगाबादेत समन्वय समितीची बैठक झाली. आजयर्पंत अशा बैठकांना ‘शांतता समिती’ असे नाव असायचे. यंदा बदल करून ‘समन्वय’ असा उल्लेख करण्यात आला. मात्र, या बैठकीत लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय व शांतता दोन्ही दिसले नाहीत. कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इत्मियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा प्रशासक अभिजित चौधरी, माजी खासदार चंद्रकांत खैरे किशनचंद तनवाणी यांच्यासह पोलिस व पालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.