महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाच्या झळा आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. 28) दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. (Weather Forecast) तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले तरी पावसाची उघडीप कायम आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत.
आज (ता. 28) मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसह पूर्व विदर्भातील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीप राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. विजांसह पावसाचा इशारा सोलापूर, सांगली, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्हयात देण्यात आला आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस
जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठे नुकसान झाले आहे.
राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून, पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. आज विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.
राज्यात मागच्या दोन महिन्यांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान मान्सूनने मागच्या दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने पावसाचे प्रमाण थोडे थांबले आहे. परंतु हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून यंदा लवकरच माघारी परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मान्सून सर्वसाधारण तारखेपेक्षा सुमारे पंधरा दिवस अगोदरच म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माघारीच्या टप्प्यात दाखल होण्याची शक्यता असल्याची हवामान विभागाने माहिती दिली आहे.