Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे ४० टक्के बांधकाम पूर्ण ; भाविकांना या महिन्यापासून दर्शन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑगस्ट । अयोध्येच्या रामजन्मभूमीवरील राममंदिराचे ४० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झाले आहे, अशी माहिती श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. या मंदिराचा पायाभरणी समारंभ दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला होता.

चंपत राय यांनी सांगितले की, राममंदिराचे तसेच या मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मंदिराच्या पायाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. या नव्याने उभारण्यात येणाऱ्या मंदिरात भाविकांना श्रीरामाच्या दर्शनाची सुविधा डिसेंबर २०२३ पासून उपलब्ध होईल. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. त्याच्या आधी अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

राममंदिराच्या वास्तूचे आयुष्यमान किमान हजार किंवा त्याहून अधिक वर्षे असावे, अशा दृष्टीनेच भक्कम पायाचे बांधकाम करण्यात आले आहे. आठ एकरांच्या रामजन्मभूमीच्या संकुलात हे मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिराच्या गर्भगृहातील बांधकामासाठी राजस्थानातील मकराना येथे आढळणारा संगमरवर वापरण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *