महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑगस्ट । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र आज म्हणजेच 29 तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या (IMD) अंदाजानुसार 29 ऑगस्ट ते ते 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश जवळपास सर्वच विभागात हलका ते मुसळधार पाऊस (Rain Alert in Maharashtra) पडू शकतो. त्यामुळं यंदा गणेशोत्मवामध्ये नागरिकांना पावसाचा सामना करावा लागणार आहे.
जून महिन्याच्या सुरूवातीला पावसानं दडी मारल्यानं सर्वजण चिंतेत होते. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती. गेल्या महिनाभर राज्यात चांगला पाऊस झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली होती. परंतु आजपासून पुढील काही दिवस राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आज सकाळपासून दरम्यान मुंबईसह (Mumbai Pune rain) ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 1 सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यात 31 तारखेपासून ते 5 सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच खानदेश मधील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. याशिवाय बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत गणरायाच्या आगमनाबरोबरचं राज्यात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचं पुनरागमन होणार आहे.
राज्यात मागच्या दोन महिन्यांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान मान्सूनने मागच्या दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने पावसाचे प्रमाण थोडे थांबले आहे. परंतु हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून यंदा लवकरच माघारी परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मान्सून सर्वसाधारण तारखेपेक्षा सुमारे पंधरा दिवस अगोदरच म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माघारीच्या टप्प्यात दाखल होण्याची शक्यता असल्याची हवामान विभागाने माहिती दिली आहे.