महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑगस्ट । एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळणं आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना अशा अनेक घडामोडी या काळात घडल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे.
शिंदे गटातील पंधरा ते सोळा आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ते म्हणाले की, मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये उद्रेकता वाढली आहे. त्यांना असं वाटत आहे की, आपण उगीचच मातोश्री आणि उद्धव साहेबांना सोडलं.
आमदारांना या गोष्टीचं वाईट वाटत असावं आणि त्यातूनच हा प्रकार घडत आहे, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, की गेलेल्या सर्व पन्नास आमदारांना मंत्रिपद मिळणं शक्य नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांच्यामध्ये उद्रेकता वाढत आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार मातोश्रीच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असा दावा खैरे यांनी केला.
दरम्यान नुकतंच पोलीस आयुक्तालयाच्यावतीने गणोशोत्सवपूर्वी प्रथेप्रमाणे आयोजित समन्वय बैठकीत राजकीय नेत्यांच्या मानपमानाचे नाट्य पाहायला मिळाले होते. शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट चिडले होते. यावरही खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस आयुक्तांनी प्रोटोकॉलनुसारच माझा सत्कार आधी केला, असं खैरे म्हणाले.