महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । यंदा दसरा मेळावा कुणाचा होणार यावरून कोणताही संभ्रम नाही. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी खुशाल करावा. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्वाळा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (29 ऑगस्ट) दसरा मेळाव्याबाबतच्या अनिश्चिततेला पूर्णविराम दिला. राज्यातील तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक मांत्रिक भाग आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत उलटसुलट चर्चा आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज करून परवानगी मागितली आहे. मात्र, महापालिकेने त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजित मगरे, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी आज ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रवेशासाठी सत्ताधारी पक्षाकडे रांग लागते, पण महाराष्ट्रात वेगळे चित्र आहे. गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत. आम्ही हिंदुत्व सोडले म्हणून भाजपने जी आवई उठवली होती, त्या आवईला छेद देणारे आज पक्षप्रवेश झाले. हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल. हिंदुत्ववादी आणि मुस्लिम कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
ठाण्याचे शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आम्ही दसरा मेळावा घेणार अशी घोषणा केली. आम्ही हिंदुत्व जपले आहे, आम्हाला दसरा मेळावा घेण्याचा हक्क आहे, असा दावा त्यांनी केला आहे. एकूण, शिवसेनेचे अभिन्न अंग असलेला दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याची शक्यता आहे.