लोकसभा निवडणूक एकत्रित लढणे शक्य; शरद पवारांनी दिले संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । ‘सन २०२४मधील लोकसभेची निवडणूक किमान समान कार्यक्रमाच्या आधारे लढण्याचा विचार केला जाऊ शकतो,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे सांगितले. त्यामुळे पुढील निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढली जाण्याची शक्यता बळावली आहे.

पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, ‘आागामी निवडणूक एकत्रित लढण्याबाबत विचार होऊ शकतो.’ ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, ‘भाजपने नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. पैसा, ईडी आणि सीबीआय यांच्या बळावर सरकारे पाडली जात आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात जे घडले, तसाच प्रयोग झारखंडमध्ये सध्या केला जात आहे. भाजपच्या या प्रयत्नांना तोंड कसे द्यायचे हे आम्हाला ठरवावे लागेल. विरोधकांनी एकजूट झाले पाहिजे.’

भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पवार यांनी नितीशकुमार यांची स्तुती केली. ‘नितीश आमचे जुने सहकारी आहेत आणि त्यांनी योग्य राजकीय निर्णय घेतला,’ असे पवार म्हणाले.

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्याबद्दल मत व्यक्त करणे शरद पवार यांनी टाळले. ‘काँग्रेसचा अध्यक्ष कोण व्हावा, कोण होऊ नये, हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मी त्रयस्थ आहे,’ असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *