Political : अमित शाह अन् राज ठाकरेंची भेट होणार का ? राज्याचं लागलं लक्ष

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ५ सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. लालबागचा गणपती, सिद्धिविनायक आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडील गणरायाचे दर्शन ते घेतील. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शाह मार्गदर्शन करतील, अशीही शक्यता आहे. काही ना काही राजकीय बैठक होईलच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिंदेगट आणि भाजपाच्या नेत्यांकडून मनसे प्रमुखराज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान भाजपा आणि मनसे युतीचा नारळ फुटणार असल्याची चिन्हं दिसून येत आहे. अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा आणि मनसेकडून अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येऊन आम्ही वरळीबरोबरच मुंबई महापालिका निश्चितपणे जिंकू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप मिळून मुंबई महापालिका जिंकेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पालिकेतील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजप कंबर कसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुका पुढील वर्षीच्या सुरूवातीला होतील, असे म्हटले जात असताना दोन-अडीच महिन्यांतच मुंबई पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी भाजपने चालविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *