छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत झळकणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी चरित्रावर आजवर अनेक चित्रपट, मालिका, नाटक अशा कलाकृती येऊन गेल्या आहेत. आजवर विविध माध्यमातून मराठ्यांचा हा देदिप्यमान इतिहास जेव्हा जेव्हा झळकला तेव्हा तो तमाम मराठीजनांच्या काळजात नव्याने प्रेरणा चेतवून गेला आहे.

तीच बाब छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यांची. मांढरे बंधूंपासून ते शरद केळकर, चिन्मय मांडलेकर यांच्यापर्यंत अनेकांनी आजवर रुपेरी पडद्यावर शिवरायांची भूमिका साकारली आहे. आता या यादीत एक नवीन नाव झळकणार आहे.

येत्या दिवाळीत येऊ घातलेल्या हर हर महादेव या चित्रपटातून अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत झळकणार आहे. एक अष्टपैलू अभिनेता असलेला सुबोध आजवरच्या त्याच्या बायोपिकसाठी देखील प्रसिद्ध आहे. बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर यांच्यानंतर आता सुबोधच्या नावे अजून एका बायोपिकची नोंद केली जाणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजने केली असून दिग्दर्शन अभिजित शिरीष देशपांडे यांनी केलं आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *