महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav) दारूबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील २ पब मालकांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. शिवाय या कारवाईत आरोप सिद्ध झाल्यास त्या २ पबवर कायमस्वरूपी निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
पुण्यात (Pune) गणेशोत्सव काळात दारूबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेशही जारी केला आहे. त्यानुसार, गणेशोत्सवाच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मद्यविक्रीची दुकाने, परमीट रुम, बिअरबार बंद ठेवावे तसंच या कालावधीत मद्यविक्री सुरु राहिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता. तरीदेखील पुण्यातील २ पबमध्ये प्रिंटेड बिले देत दारु विकण्यात आली होती. याबाबत साम टिव्हीने सर्वप्रथम बातमी दाखवली होती.
युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. सध्या सुरू असलेल्या गणपती उत्सवादरम्यान दारू न विकण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या शहरातील दोन पब वर कारवाईची त्यांनी मागणी केली होती.