Nitin Gadkari: सीटबेल्टपासून वाचण्यासाठी ४ मुख्यमंत्र्यांनी लढवली शक्कल; गडकरींचा किस्सा चर्चेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिस्त्री यांचं रस्ते अपघातात निधन झालं. मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावला नसल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली होती. त्यानंतर आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही भाष्य केलं आहे.

या विषयावर गडकरी माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारतीयांना रस्ते सुरक्षेच्या प्रकरणी मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपल्याला वाटतं की मागच्या सीटवर सीटबेल्टची गरज नाही, पण असा विचार करणं अगदी चुकीचं आहे. मीही माझ्या तरुणपणी अनेक नियम तोडले आहेत. पण हे किती धोकादायक होतं, याची तेव्हा जाणीव नव्हती.

यावेळी त्यांनी आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवणही सांगितली. ते म्हणाले की, कॉलेजच्या काळात आम्ही एकाच गाडीवर चौघं चौघं फिरायचो. नंबरप्लेट हाताने लपवून ठेवायचो, म्हणजे दंड भरावा लागू नये. हीच मानसिकता आपल्याला बदलायची आहे, नियमांचं पालन करायचं आहे.

चार मुख्यमंत्र्यांना आपण नियम तोडताना रंगेहात पकडल्याचंही सांगितलं आहे. गडकरींनी सांगितलं की, मी चार मुख्यमंत्र्यांसोबत गाडीमध्ये बसलो होतो. सर्वांनी सीटबेल्ट जिथे लावतात, तिथे क्लिप लावली होती. ज्यामुळे अलार्म वाजू नये. मी जेव्हा हे पाहिलं, तेव्हा ड्रायव्हरला ओरडलो आणि क्लिप काढून टाकली. त्यानंतर मी अशा प्रकारच्या क्लिप्सवर बंदी घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *