महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । दादरमधील शिवाजी पार्कच्या (Shivaji Park) मैदानावर कोण दसरा मेळावा (DasaraMelava) घेणार यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेचे १० ते १५ नेते विजयादशमीला शिंदे गटात ‘सीमोल्लंघन’ करणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र याची कल्पना आल्यामुळे उद्धव ठाकरेंनी दसऱ्यापूर्वीच या नेत्यांची हकालपट्टी करण्याची तयारी सुरु केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या धक्कातंत्राची उद्धव ठाकरे यांना आधीच कुणकुण लागल्याचं बोललं जातं. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा रिपोर्ट ठाकरेंकडे पोहोचला आहे. त्यामुळे दसऱ्याआधीच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची तयारी ठाकरेंनी केल्याचं पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक खासदार, दोन आमदार आणि पाच माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे. या आठ लोकप्रतिनिधींसह एकूण दहा ते पंधरा सेना नेत्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्याचं बोललं जात आहे. या सर्वांची वेगवेगळ्या महामंडळांवर वर्णी लागण्याची शक्यता आहे किंवा त्यांना महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी मिळण्याची चिन्हं आहेत. मात्र त्यापूर्वीच ठाकरेंकडून हकालपट्टीची कारवाई होण्याची चिन्हं आहेत.