Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’मधील खलनायक सौरभ गुर्जर नेमका आहे तरी कोण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट काल प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या सर्वांमध्ये मात्र एका व्यक्तीने लक्ष वेधून घेतलं आहे. आणि तो व्यक्ती म्हणजे ब्रह्मास्त्र चित्रपटातील खलनायक सौरभ गुर्जर होय. मेगास्टार अमिताभ आणि रणबीर कपूरसारख्या स्टार्ससोबत सौरभने ब्रह्मास्त्रमध्ये मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे. सौरभ मूळचा ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा येथील आहे. त्याच्या गावी सध्या प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. सौरभला WWE मध्ये रेसलर म्हणून जायचं होतं. पण नशिबाने त्याला बॉलिवूडमध्ये आणलं.आज आपण सौरभबाबत जाणून घेणार आहोत.

सौरभ गुर्जर हा बॉलिवूडचा नवा खलनायक म्हणून समोर येत आहे. ब्रह्मास्त्रमध्येसुद्धा तो त्याच व्यक्तिरेखेत दिसून आला आहे.आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 14 वर्षांपूर्वी सौरभ मुंबईमध्ये आला होता. त्याच्या पिळदार शरीरामुळे सौरभला रिअॅलिटी शो आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका मिळाल्या. यादरम्यान सौरभला 2017 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात भूमिकेची ऑफर मिळाली होती. या चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सौरभ WWE चा रेसलर बनला आहे. तो सध्या USA मध्ये WWE मध्ये खेळत आहे.चित्रपट रिलीज झाल्यानंतर सौरभ प्रचंड चर्चेत आला आहे.

सौरभ गुर्जर हा ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा येथील एक रेसलर आहे. सौरभ ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. 37 वर्षीय सौरभचं शालेय शिक्षण डबरा येथे झालं आहे. ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातून त्यानं महाविद्यालयीन शिक्षणघेतलं आहे. महाविद्यालयीनकाळात सौरभ किक बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन होता. तो लहानपणापासून WWE रेसलिंगचा चाहता होता. त्याला स्वतः रेसलर बनायचं होतं. म्हणून काहींच्या सल्ल्यावरुन सौरभ मुंबईत आला होता.मुंबईत आल्यानंतर त्याने WWE साठी आपली शरीरयष्टी बनवायला सुरुवात केली. सौरभची दमदार शरीरयष्टी पाहून रिअॅलिटी शोमध्ये त्याची निवड झाली होती.

सौरभच्या कामाबाबत सांगायचं तर, 2013-14 मध्ये सौरभने महाभारतात भीमची भूमिका साकारली होती. तर 2016-17 मध्ये सौरभने संकटमोचन महाबली हनुमानमध्ये रावणाची भूमिका साकारली आहे. WWE मध्ये निवड झाल्यानंतर, सौरभला सुपरहिरोवर आधारित भारतातील सर्वात मोठा चित्रपट ब्रह्मास्त्रमध्ये मुख्य खलनायकाची भूमिका मिळाली होती. सध्या हा अभिनेता अमेरिकेत बॉक्सिंग रिंगमध्ये आपला कमाल दाखवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *