सतर्क रहा : सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांतील भेसळ वाढली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । सणासुदीच्या काळात मुंबईत अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून सणासुदीच्या काळात बाजारात भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) विशेष मोहिमेतून उघडकीस आले आहे. ‘एफडीए’ने मुंबईमधून चार लाख ८४ हजार ८२२ रुपये किंमतीचे खाद्यतेल, तर दोन लाख २० हजार ६६० रुपये किंमतीचे चॉकलेट आणि चहा पूड जप्त केली. विविध अन्नपदार्थांचे एकूण ९३ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

दरवर्षीप्रमाणे एफडीएच्या बृहन्मुंबई विभागाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर १ ऑगस्टपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत १ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान मिठाई, फरसाण आणि खाद्यतेलाच्या आस्थापनाविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत मिठाईचे ५१, नमकीनचे ६, खाद्यतेलाचे ७, तुपाचे १० आणि इतर अन्नपदार्थांचे २२ असे एकूण ९६ नमूने ताब्यात घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून यासंबंधीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषीविरोधात कारवाई करण्यात येईल, असे एफडीएच्या बृहन्मुंबई विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *