सुप्रीम कोर्टाने निर्णयामुळे आमदारकी धोक्यात ! शिंदे गटाचा एक आमदार होणार कमी ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठे खिंडार पडले आहे. एक एक करून 40 आमदार शिंदे गटात दाखल झाले आहे. अजूनही शिंदे गटात इन्कमिंग सुरूच आहे. अशातच जात प्रमाणपत्र प्रकरणी जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यामुळे शिंदे गटात दाखल झालेल्या शिवसेनेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे पद धोक्यात आले आहे.

लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी २०१९ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. चोपडा विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या आरक्षीत जागेवरून त्या विजयी झाल्या होत्या. तथापि, त्यांच्या विरूद्ध पराजीत झालेले उमेदवार जगदीश वळवी यांनी त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. यातून जात पडताळणी समितीने लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरोधात लताताईंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती.

यानंतर त्यांनी पुन्हा एकदा खंडपीठात दाद मागितल्यानंतरही त्यांना दिलासा मिळाला नव्हता. यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. लताताई सोनवणे यांच्या याचिकेवर न्या. के. एम. जोसेफ आणि ऋषीकेश रॉय यांच्यासमोर आज कामकाज झाले. यात न्यायालयाने त्यांच्या मागणीनुसार जात पडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे लताताई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. आता त्या पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पुनर्विलोकन याचिका दाखल करू शकतात. यावर आता नेमके काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लताताई सोनवणे यांनी शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्या आता अपात्र झाल्या असल्याने शिंदे गटाचे संख्याबळ एकने कमी होणार आहे. यामुळे आता लताताई सोनवणे यांच्या आगामी हालचालीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *