Vedanta and Foxconn project : …… हा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? राज्य सरकारवर राज ठाकरे गरजले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ सप्टेंबर । Vedanta and Foxconn project to Gujarat : वेदांता आणि फॉक्सकॉनचे प्रकल्प (Vedanta and Foxconn project ) गुजरातला (Gujarat) हलविल्यानंतर आता राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला शिवसेनेने घेरले असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सवाल करत जाब विचारला आहे. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. (Raj Thackeray on Eknath Shinde Government)

https://twitter.com/RajThackeray/status/1569704404085010432?s=20&t=efc0CtYWJOMoHGDUsrC1Tg

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होण्याची शक्यता होती. असे असताना वेदांता आणि फॉक्सकॉनचे प्रकल्प गुजरातला गेलेच कसे, असा सवाल माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल शिंदे सरकारला विचारला होता. याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर प्रकल्प गेल्याची कारणं शोधणार आहोत, अशी सारवासारव उद्योगमंत्र्यांना करावी लागली होती.

दरम्यान, राज ठाकरे यांनी शिंदे सरकारला खडेबोल सुनावले आहे. त्याचवेळी फॉक्सकॉन प्रकरणी राज ठाकरे यांनी चौकशीची मागणी केली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार गंभीर, चौकशी व्हायला हवी. ‘राजकारणाच्या पलीकडे जाऊन विषयाकडे बघायला हवं’, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?

हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं, असे राज म्हणाले.

दरम्यान, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचं खापर मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर फोडले आहे. आमच्या नव्या सरकारनं वेदांता फॉक्सकॉनला तळेगावजवळ 1100 एकर जमीन देऊ केली होती. 35 हजार कोटींच्या सबसिडी ऑफर केल्या. ‘पण आधीच्या 2 वर्षांत प्रतिसाद कमी पडला असावा…’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारवर जबाबदारी ढकलली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *