बारामतीतील हा मोठा प्रकल्प जुन्नरला हलवणार ; शिंदे सरकारचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ सप्टेंबर । शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. आता गुरुवारी झालेल्या बैठकीतही एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बिबट्या सफारी प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी आंबेगव्हाण (ता.जुन्नर) येथेच करण्याचे आदेश दिले आहेत. बारामतीमध्ये साकार होणार असणारा बिबट्या सफारी प्रकल्प आता जुन्नर इथे साकारण्याचा निर्णय घेत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे.

याआधी महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प बारामतीमध्ये साकारण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदलला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी बारामती बिबट्या सफारी या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 60 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली होती. पर्यटनाला चालना देण्यासाठी या सफारीची योजना करण्यात आली आहे.

हा प्रकल्प बारामतीकडे गेल्यावर शिंदे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आक्षेप घेतला होता. ‘जुन्नरचे आमदार-खासदार झोपेत आहेत, तुमच्या डोळ्यादेखत बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला गेला कसा’, अशा शब्दांत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी टीका केली होती. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसची थापेबाजी आणि बोगसगिरी उघडी पडत असल्याचंही त्यावेळी ते म्हणाले होते.

आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द केले गेले आहेत. यातच आता शिंदे सरकारने हा प्रकल्प जुन्नरमध्येच साकारला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीसाठी हा आणखी एक धक्का असल्याचं मानलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *