महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० सप्टेंबर । गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाज्यांची आवक ६० टक्क्यांनी घटल्याने त्यांचे किरकोळ बाजारातील दर भडकले आहेत. कोथिंबिरीने कहर केला असून, किरकोळ बाजारात जुडीचा भाव शंभरीपार गेला आहे. मेथीची जुडीही ५० रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेल्या भाज्याही पावसाच्या तडाख्याने खराब झाल्या. परिणामी, त्यांची आवक ४० टक्क्यांवर आली आहे. फ्लॉवर, शिमला मिरची, फरसबी, गवार, भेंडी या भाज्यांनी किरकोळ बाजारात किलोमागे शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. कोिथबिरीने तर कहर केला आहे. घाऊक बाजारात कोिथबिरीची एक जुडी ८० रुपयांवर गेल्याने किरकोळ बाजारात ती १०० रुपयांवर गेली आहे. सर्वाधिक पसंतीच्या मेथीच्या एका जुडीचा दर ५० रुपयांवर गेला आहे. काही दिवसांपूर्वी फ्लॉवर, शिमला मिरची, फरसबी, गवार, भेंडीचे दर किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये होते. सध्या किरकोळ बाजारात त्यांचे प्रति किलो दर १०० ते १२० रुपयांवर पोहोचले आहेत.
कोथिंबिरीची आवक ७० टक्क्यांनी घटली आहे. किरकोळ विक्रेत्यांनी हिरव्या मसाल्यातून कोिथबिरीला वजा केले आहे. काही दिवसांपूर्वी २५ ते ३० रुपयांना मिळणारी कोिथबिरीची लहान जुडी सध्या ५० ते ६० रुपयांना, तर ५० ते ६० रुपयांना विकली जाणारी मोठी जुडी सध्या १२० ते १५० रुपयांना विकली जात आहे.