“आम्हीच तुम्हाला तीन महिन्यांपूर्वी आस्मान दाखवलं” ; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि . २२ सप्टेंबर । एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थक करणारे ४० आमदार पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत फुटी पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेत प्रमुख विरोधक असणाऱ्या भारतीय जनता पार्टीबरोबरच शिंदे गटाला लक्ष्य केलं. यावेळेस ठाकरेंनी शिंदे गटाला उल्लेख मिंधे गट असा करतानाच शिंदे गटाला बाप पळवणारी टोळी म्हटलं. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही तासांमध्ये दिल्लीतील भाषणातून उत्तर दिलं आहे.

“आज राज्याच्या प्रमुखांनी मला मिंदे गट म्हटलं आहे. आम्ही मिंदे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर कोण गेलं? मिंदेपणा कोणी केला हे सर्व महाराष्ट्र आणि देश बघतोय,” असं मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या भाषणात म्हटलं. तसेच उद्धव ठाकरेंनी आस्मान दाखवण्यासंदर्भात केलेल्या विधानालाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. “त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही आता आस्मान दाखवू. कोणाला तर आम्हाला आस्मान दाखवणार. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला आस्मान दाखवण्याची वेळ तुमच्यावर येणारच नाही, कारण आम्हीच तुम्हाला तीन महिन्यांपूर्वी आस्मान दाखवलं आहे,” असा टोला शिंदेंनी लगावला.

“शिवसैनिकांवर विश्वास नाही म्हणून त्यांच्याकडून खर्च करुन घेत शपथपत्रं घेत आहेत,” असा टोमणाही शिंदेंनी लगावला आहे. “ते (कार्यकर्त्यांना) भेटत नाहीत म्हणून अनेकजण माझ्याकडे आलेत. मी नक्की सगळ्यांना भेटणार कारण मी तुमच्यातलाच एक आहे,” असा शब्दही शिंदेंनी आपल्या भाषणात समर्थकांना दिला.

“आम्ही ढोकळा खायला लागलो अशी टीकाही त्यांनी केली. अरे पण आम्ही ठेचा खाऊनच मोठे झालो आहोत. म्हणून तर त्यांना ठेचलंय. ठेचा खाऊन मोठं झाल्यानेच आपल्या लोकांनी त्यांना ठेचलंय ना. महाविकास आघाडी खाली पाडण्याचं काम छोटं काम नव्हतं,” असं विधानही शिंदे यांनी केलं. यानंतर शिंदेंनी बाप चोरणारी टोळी या टीकेवरुनही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

“मुले पळवणारी टोळी कार्यरत असते, हे आतापर्यंत माहित होते. पण, आता बाप पळविणारी औलाद आली आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला बीकेसीमध्ये झालेल्या मेळाव्यातील भाषणामधून लक्ष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या फोटोकडे पाहून बाळासाहेबांचा फोटो आहे ना, असा सवाल करीत ‘नाही तर तो पण पळवून नेलेला असायचा’, अशी टिप्पणी करत शिंदे गटाला टोला लगावला.

उद्धव यांनी केलेल्या या टीकेचे उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिल्लीतील भाषणातून उत्तर दिलं. “आम्हाला म्हटलं बाप चोरणारी टोळी. खरं म्हणजे आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन शिवसैनिक आहोत. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे असं आम्ही म्हणायचं का?” असा प्रश्न शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला. “अरे काय म्हणताय तुम्ही? काय सांगताय? लोकांची मनं, मतं बघा. जनतेच्या मनाचा आदर करा. आम्ही टीका करणार नाही. आम्ही कामाने तुम्हाला उत्तर देऊ,” असं शिंदेंनी भाषणात म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *