महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि . २२ सप्टेंबर । देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष नाही. गुन्हे दाखल करा आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करा हा केंद्राचा प्रमुख प्रकल्प झालाय, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
एनडीएच्या कारकीर्दीत ईडीने किती जणांवर कारवाया केल्या, विरोधी पक्ष आणि नेत्यांविरुद्ध त्यांच्या कारवाया कशा वाढवल्या आहेत, हे वर्तमानपत्रांतील बातम्यांवरून दिसून येते. जेव्हा त्यांना निवडणुकीच्या निकालाबाबत काही शंका वाटतात, तेव्हा एक महत्त्वाचे काम म्हणून अशी पावले उचलली जातात. विरोधी पक्षांच्या लोकांवर खटले भरायचे, चौकशी लावायची, अटक करायची हा केंद्र सरकारचा महत्त्वाचा कार्यक्रमच झाल्याची टीका शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केली.
दसरा मेळाव्यासाठी जागा मिळाली आहे याचा आनंद आहे. त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. त्या परंपरेसंदर्भात पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कची मागणी केली असेल तर त्या मागणीवर विलंब लावून वाद वाढविणे योग्य नसल्याचे शरद पवार म्हणाले.
पत्राचाळ प्रकरणात माझी किंवा कुणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीला आम्ही तयार आहोत. चार-आठ-दहा दिवसांत म्हणजे जेवढय़ा लवकर करता येईल तितक्या लवकर ही चौकशी करा. मात्र चौकशी झाल्यानंतर जो आरोप करण्यात आला आहे, तो वास्तव आणि सत्याला धरून नसेल तर आरोप करणाऱयांच्या विरोधात काय भूमिका घेणार हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे थेट आव्हान शरद पवार यांनी दिले आहे.