काँग्रेसचा बडा नेता भाजपात, प्रवेशावेळी विनोद तावडेंची ताकद दिसली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ सप्टेंबर । हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष हर्ष महाजन (Harsh Mahajan) यांनी पक्षाला मोठा झटका दिला. गेल्या ४५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या महाजनांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या उपस्थितीत हर्ष महाजनांनी भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे दिल्ली दरबारी वजन वाढलेले महाराष्ट्रातील नेते आणि माजी मंत्री विनोद तावडेही (Vinod Tawde) यावेळी उपस्थित होते.

काँग्रेस दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाल्याची टीका हर्ष महाजन यांनी भाजपप्रवेशावेळी केली. तसेच पक्षाकडे ना दूरदर्शीपणा राहिलाय ना कार्यकर्ते असा टोलाही हाणला.

“मी ४५ वर्षे काँग्रेसमध्ये होतो. आज काँग्रेस दिशाहीन, नेतृत्वहीन झाली आहे. तळागाळातील कार्यकर्ते नाहीत” असे महाजन भाजपमध्ये प्रवेश करताना म्हणाले. महाजन हे हिमाचल प्रदेश राज्य सरकारचे माजी मंत्री आहेत. ते माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय मानले जात. सिंह यांचे गेल्याच वर्षी निधन झाले.

हिमाचल प्रदेशातील काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधताना दिल्लीप्रमाणेच राज्यातही मायलेकाचे राज्य असल्याचं महाजन म्हणाले. “वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह आता प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे पक्षाचे आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये काहीही दम उरला नाही” असंही महाजन म्हणाले.

हर्ष महाजन यांचे स्वागत करताना पियुष गोयल म्हणाले की, त्यांनी काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे भूषवली असून त्यांनी स्वच्छ प्रतिमा राखली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांनंतर राज्यात सत्ता टिकवून भाजप इतिहास रचणार असल्याचा दावा गोयल यांनी केला. राज्यात भाजप सरकारची पुनरावृत्ती होईल, असे गोयल म्हणाले.

राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असताना हर्ष महाजन यांचा राजीनाम्याचं वृत्त आलं आहे. काँग्रेसचे अनेक नेते गेल्या काही काळात पक्षातून बाहेर पडताना दिसत आहेत. राजीनाम्यांच्या मालिकेतील सर्वात मोठा धक्का म्हणजे यावर्षी ऑगस्टमध्ये दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला ठोकलेला रामराम. आझाद यांनी पक्ष सोडताच राहुल गांधींसह काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध कठोर शब्द वापरून आपला असंतोष व्यक्त केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *