Rashmi Thackeray Thane : रश्मी ठाकरे ठाण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया म्हणाले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । मागच्या दोन महिन्यापूर्वी शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेसह ठाकरे घराण्यातील नेत्यांनी आगपाखड करण्यास सुरूवात केली. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना असा वाद सुरू झाला. यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात सहभागी झाल्या. ठाण्यात येत रश्मी ठाकरेंनी देवीची महाआरती केली. यावेळी रश्मी ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

एकनाथ शिंदे यांनी मागच्या कित्येक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे आमचे दैवत असल्याचे सांगत. पुढची राजकीय दिशा ठरवत आहेत. दरम्यान अचानक रश्मी ठाकरे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शन घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. रश्मी ठाकरेंनी केलेल्या महाआरतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवीचे दर्शन कोणीही घेऊ शकतो. रश्मी ठाकरे यांनीही दर्शन घेतले असेल, तर चांगली गोष्ट आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

ते माध्यमांशी बोलत होते यावेळी ते म्हणाले, देवीचे दर्शन घेण्यास कोणालाही बंदी नाही. दर्शन सर्वांनीच घेतले पाहिजे. त्यांनीही देवीचे दर्शन घेतले असेल तर चांगलीच बाब आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. महाआरतीनंतर ठाकरे गटाकडून देवीच्या मंडपातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या उत्सवाला उपस्थिती लावण्याआधी रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात होत्या. ठाण्याहून मातोश्रीवर परतत असताना रश्मी ठाकरे यांनी भांडूपमध्ये हॉल्ट घेतला. भांडूपमधल्या संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी रश्मी ठाकरे गेल्या. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबाची भेट घेतली.

संजय राऊत यांच्या घरी देखील नवरात्र उत्सव साजरा केला जातो, त्यामुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि राऊत कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रश्मी ठाकरे या राऊतांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी पोहोचल्या. संजय राऊत यांच्यावर अटकेची कार्यवाही झाल्यानंतर पहिल्यांदाच रश्मी ठाकरे या त्यांच्या घरी दाखल झालेल्या आहेत. एकंदरीत संजय राऊत हे सध्या कारागृहात असताना अशा कठीण प्रसंगात ठाकरे कुटुंबीय राऊत यांच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी राऊतांच्या कुटुंबीयांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *