राठोड विरुद्ध राठोड सामना रंगणार ? ; वंचित बहुजन आघाडीला मोठं खिंडार, प्रकाश आंबेडकरांनंतरचा ‘हा’ नेता शिवसेनेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । वंचित बहुजन आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) पक्षातील महत्त्वाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते रविकांत राठोड (Ravikant Rathod) आज शिवबंधन बांधणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा मोठा सोहळा होणार आहे. त्यांच्या पाठोपाठ मराठवाडा, खान्देश, विदर्भातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करतील.

विशेष म्हणजे रविकांत राठोड हे बंजारा समाजातील बडे नेते आहेत. विदर्भात बंजारा समाजाचे लोकप्रिय नेते शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला मोठी चिंता होती.मात्र आता रविकांत राठोड यांच्या शिवसेना प्रवेशानंतर बंजारा समाजाची मतं काबीज करणं शिवसेनेला सोपं जाईल. त्यामुळे राठोड विरुद्ध राठोड असा सामना आगामी काळात पहायला मिळू शकतो.कालच यवतमाळच्या पोहरादेवी येथील महंत सुनिल महाराज यांनी शिवसेना प्रवेशाची घोषणा केली. त्यांचं मन वळवण्यातही रविकांत राठोड यांचीच मोठी भूमिका असल्याचं म्हटलं जातंय.

2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देण्यात प्रकाश आंबेडकर सरस ठरले. मात्र त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला राज्यातून घरघर लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.पक्षातील गटबाजीमुळे वंचितचे राज्यपातळीवरील अनेक नेते नाराज आहेत. पक्षप्रमुख प्रकाश आंबडेकर यांची विचारधारा चांगली होती. मात्र ती सध्या मर्यादित आहे. त्यामुळे समाजाला न्याय मिळत नाही, अशी अनेकांची भावना आहे.

पक्षातील वरिष्ठ नेते मनमानी करतात. असा आरोप करत समाजाला न्याय देण्यासाठी वंचित सोडून हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेत आहोत अशी घोषणा वंचितचे नेते रविकांत राठोड यांनी केली आहे.वंचित मधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राठोड हे बंजारा समाजाचे आहेत. त्यांच्या वंचित सोडण्याने पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. वंचित मध्ये ओबीसींवर अन्याय केला जातोय. शिवाय प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर हे विश्वासात न घेता काम करतात असा गंभीर आरोप रविकांत राठोड यांनी केला आहे.

रविकांत राठोड यांच्यासोबत वंचितमधील जवळपास 15 मुख्य नेते शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेणार आहेत. त्यामुळे वंचितला याचा जबर धक्का बसणार आहे.रविकांत राठोड हे बंजारा समाजाचे आहेत. बंजारा ब्रिगेड संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. बंजारा समाजासाठी ही संघटना काम करते. संपूर्ण राज्यासह तेलंगाणा आणि कर्नाटकात या संघटनेचे जाळे आहे. रविकांत राठोड हे वंचितमध्ये स्टार प्रचारक म्हणून ते पक्षाच्या दुसऱ्या स्थानी होते.मूळचे ते बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील रहिवासी आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे मंत्री संजय राठोड शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेत बंजारा नेता नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *