महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ ऑक्टोबर । सणासुदीच्या काळात पुण्यातील (Pune) वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण, पुण्यात सीएनजीच्या (CNG) दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून ही वाढ करण्यात आली असून या दरवाढीमुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने हा निर्णय घेतला आहे. (Pune News Today)
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने वाहनधारकांनी आपला कल सीएनजी गाड्यांकडे वळवला आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहनं असल्याने सीएनजी गॅसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग ही सुद्धा दरवाढीची कारणं आहे.
विशेष बाब म्हणजे, १ एप्रिल पासून सीएनजीच्या दरात वाढच होत आहे. शहरात पूर्वीच सीएनजी ९१ रूपयांवर गेला होता. पण, काही दिवसांपूर्वी एमएनजीएलने सीएनजीच्या दरात चार रूपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन चालकांना आता एका किलोसाठी ८७ रूपये द्यावे लागत होते.
दरम्यान, आता पुन्हा सीएनजीच्या दरामध्ये ४ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना रविवारी मध्यरात्रीपासून १ किलो सीएनजीसाठी ९१ रुपये मोजावे लागणार आहेत.सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहन धारक तसेच रिक्षा चालकांना फटका बसला आहे.