महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑक्टोबर । ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची देशव्यापी पदयात्रा सुरू आहे. या पदयात्रेला आतापर्यंत चांगला प्रतिसादही मिळाल्याचं चित्र आहे. त्यामुळे काँग्रेससह इतर बिगरभाजप पक्षांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारीही या यात्रेत सहभागी होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ही पदयात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही या पदयात्रेत दिसू शकतात, असा अंदाज लावण्यात येत होता. मात्र या पदयात्रेबाबत आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली आहे. यात्रेत काँग्रेसमधील सर्वांनी सहभागी होणे योग्य आहे. त्यामध्ये इतरांनी सहभागी होण्याचे कारण मला दिसत नाही,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस ही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का,’ या प्रश्नावर पवार बोलत होते. गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली. ती येत्या शुक्रवारी राज्यात देगलूर (जि. नांदेड) येथे पोहोचणार आहे.