25 हजार भाविकांच्या उपस्थितीत 5 वर्षांनी सप्तशृंगी गडावर बोकड बळी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ ऑक्टोबर । न्यायालयीन प्रक्रियेत गेली पाच वर्षे अडकलेल्या बोकड बळी प्रथा सप्तशृंग गडावर बुधवारी विधिवत पार पडली यास काही संतांचा विरोध असला तरी तो या वेळी जाणवला नाही. महाराष्ट्रासह विविध राज्यातील आलेल्या २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे ५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या दशमीनिमित्त विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांनी सपत्नीक श्री सप्तशृंगी देवीची महापूजा केली. सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. सालाबादप्रमाणे अश्विन नवमीस सप्तशृंगगडावर नवमीच्या दिवशी शतचंडी याग व होमहवन विधी सुरू करून त्याची पूर्णाहुती दशमीच्या दिवशी बोकड बळीच्या विधीनंतर पुरोहितांच्या मंत्रघोषात बळीची आहुती देऊन दसऱ्याचा सोहळा पार पडला.

बोकड बळीच्या विधिवत पूजेसाठी सरपंच नांदुरी, सप्तशृंगगड, विश्वस्त संस्था आणि परंपरेचे मानकरी यांनी महसूल व पोलिस प्रशासनाच्या प्राप्त सूचनेनुसार पूर्तता केली. या प्रसंगी आमदार राम शिंदे, विश्वस्त संस्थेचे विश्वस्त बंडू कापसे, विश्वस्त अॅड. ललित निकम, मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख यांच्यासह विविध विभागप्रमुख, पर्यवेक्षक व कर्मचारी वर्ग तसेच ग्रामपंचायत आणि रोप वे पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक रहिवाशांना विशेष दर्शन मौजे सप्तशृंगगड येथील स्थानिक रहिवाशांना दसऱ्यानिमित्त विशेष दर्शन उपलब्ध करून देण्यात आले. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टमार्फत व्यवस्था करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *