महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे निव्वळ शिमगा होता, त्यापलीकडे या भाषणात काहीच नव्हते. मी अशा शिमग्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नसतो, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मी काल नागपूरात धम्मचक्र परिवर्तनाच्या कार्यक्रमात होतो. त्यामुळे मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाचेही भाषण ऐकले नाही. नंतर दोन्ही भाषणांचा सारांश माझ्यापर्यंत पोहोचला. तसेच यूट्युबर मी एकनाथ शिंदे यांचे थोडेफार भाषण पाहिले. पण उद्धव ठाकरे यांचे भाषण हा केवळ एक शिमगा होता. त्यावर फार बोलण्यात अर्थ नाही, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर थेटपणे बोलण्यास नकार दिला असला तरी त्यांच्या काही आरोपांचे खंडन जरूर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिली होती, या विरोधकांच्या आक्षेपाविषयी उपमुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले. त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, जे असं म्हणतात, त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तुमच्या स्क्रिप्ट रायटरला जराशी सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) दाखवायला सांगा. नाहीतर तुमचा स्क्रिप्ट रायटर बदलून टाका. आता आम्हालापण तेच तेच ऐकून कंटाळा आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुकही केले. मी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन यासाठी करतो की, त्यांनी शिवसेना कोणाची हे दाखवून दिले. काल ज्या प्रमाणात बीकेसी मैदानावर लोकं पाहायला मिळत होती, त्यावरुन हे सिद्ध होते. बीकेसी मैदानाची क्षमता शिवाजी पार्कच्या दुप्पट आहे. तरीदेखील बीकेसी मैदान तुडुंब भरले होते. या दसरा मेळाव्यासाठी मुंबई आणि महानगर क्षेत्र तसेच राज्यभरातून लोकं आली होती. या शिवसैनिकांनी शिवसेना कोणाची हे दाखवून दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.