महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड -पंजाबमध्ये यात्रेकरूंना सोडून आलेल्या चार वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली असताना आता थेट लंगर साहिब गुरुद्वारा परिसरात कार्यरत असणाऱ्या २० जणांचे अहवाल पाझिटिव्ह आल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. यात्रेकरूंना सोडून आलेले वाहनचालक कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाने उशिरा का होईना लंगर साहिबमधील वेगवेगळ्या लोकांचे ३० एप्रिल व १ में असे लागोपाठ दोन दिवस जवळपास ९७ लोकांचे स्वाब घेतले होते.त्यापैकी २० लोक कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.शनिवारचा दिवस उजाडला तो ही माहिती घेऊनच.२० जणांना कोरोनाची लागण झाली यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.पण अधिकृत माहिती समोर आल्यानंतर नांदेडकर हादरून गेले आहे.
दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून सकाळपासून अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.आणखी काही अहवाल येणे बाकी असून त्यात काही जण पाझिटिव्ह आढळून आल्यास ती बाब नांदेडकरांना चिंतेत टाकणारी आहे.
या सर्व कोरोनाबाधित रुग्णांना एनआयआर भवन कोविड केयर सेंटर येथे ठेवण्यात आले असून या भागात संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.