‘तुझी उंची किती, डोकं केवढं’; कोंबडीचोर म्हणत राऊतांचा नारायण राणेंवर टीका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० ऑक्टोबर । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. इकडचे ”खोके” ‘सामना’मध्ये दाखवून व्हाइट करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे. दसरा मेळाव्यातील भाषणानंतर टीका करताना राणेंनी उद्धव ठाकरेंच्या संपत्तीचाही प्रश्न उपस्थित केला. तसेच, दसऱ्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर फक्त तमाशा केला. साहेबांनी जगात नाव केलं. पण या माणसाची अजिबात पात्रता नाही”, असंही राणे म्हणाले होते. राणेंच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोंबडीचोर असा उल्लेख करता राणेंवर राऊतांनी प्रहार केला.

ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत बोलताना विनायक राऊत यांनी बीकेसीवरील सभेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यानंतर, नारायण राणेंवरही प्रहार केला. या महाराष्ट्रात कर्मवीर झाले, प्रबोधनकार झाले, त्याच महाराष्ट्रात लोकांनी कोंबडीचोर ही पदवी दिली, तीही बिनपैशाची, असे म्हणत नारायण राणेंवर जबरी टीका केली. ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली, त्यावेळी उद्धव ठाकरे ६ वर्षांचेच होते. पण, त्या ६ वर्षांत त्यांच्यावर झालेल्या संस्कारातूनच त्यांनी शिवसेना उभी केली. पण, शिवसेना स्थापन झाली तेव्हा तू काय कोंबडीची पिसं उपटत होतास, तुझी उंची किती डोकं केवढं, असे म्हणत राऊत यांनी नारायण राणेंना लक्ष्य केलं. एकदा नाही, तर दोनवेळा विधानसभेला आपटी बार केला. तसेच, लोकसभेला जागा दाखवून दिली, असेही राऊत यांनी म्हटले.

“उद्धव ठाकरे नेमकं करतात काय? काहीही न करता ते संपत्तीचे मालक कसे झाले?”, असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी हल्लाबोल केला. तसंच उद्धव ठाकरेंनी कधी एकातरी शिवसैनिकाला मदत केली आहे का? एकनाथ शिंदे आणि या नारायण राणेनं शिवसेना तळागळापर्यंत पोहोचवली. उद्धव ठाकरेंचं पक्ष वाढीसाठी नेमकं योगदान काय? ते नुसते आयत्या बिळावर नागोबा आहेत, असं नारायण राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *