यंदा दिवाळीनिमित्त एसटीच्या 1500 जादा गाड्या धावणार; उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ ऑक्टोबर । दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान या गाड्या धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी गुरुवारी दिली.

दरम्यान, एसटी महामंडळाने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे. तर ६५ ते ७५ वर्षांदरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत अनुज्ञेय केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चन्ने यांनी केले आहे.

दिवाळीच्या सुटीत महाविद्यालये व शाळांना सुट्या असतात. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन १४९४ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्याटप्प्याने गाड्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद प्रदेशातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ आणि अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *